संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी परिसर म्हणजे निसर्गाने दोन्ही हातांनी उधळलेल्या अनुपम सौन्दर्यांचे जणू एक शिल्पच म्हणावे लागेल. सह्याद्रीच्या कुशीत, दोन जिल्हे ( पुणे, अहमदनगर ) आणि तीन तालुक्यांच्या ( संगमनेर, जुन्नर, अकोले ) सरहद्दीवर वसलेले, तीनशे उंबरठा असणारं म्हसवंडी हे छोटंसं गाव.
आज एक विकसनशील गाव म्हणून संगमनेर तालुक्यातील म्हसवंडीची ओळख आहे.
परंतु एके काळी छान असलेले गावाचे जंगल लुटलं आणि गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागली. पंचवीस वर्षापूर्वी त्यावर उपाय म्हणून इंडो-जर्मन पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत, हरमन फादर बाकर यांच्या नेतृत्वाखाली आणि ‘वॉटर’ संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हयातील पहिला यशस्वी पाणलोट प्रकल्प राबविण्यात आला आणि या पाणलोट उपचारांमुळे दुष्काळाचे हे चित्र बदललं. गाव विकासासाठी कास धरून पुढे जाऊ लागला.
दरम्यानच्या काळात पाण्याच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात प्रथम क्रमांकाचा जल आकार पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर अनेक क्षेत्रात गावाने उल्लेखनीय कार्य केले. त्यात बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरण असो किंवा पर्यावरण पूरक वृक्षलागवड आणि संवर्धन असो, वनसंवर्धन असो तथा निसर्ग अधिक बहरावा त्यातून पर्यावरण अधिक संतुलित राहावे म्हणून कुऱ्हाडबंदी, चराई बंदी, बोअरवेल बंदी अशा नियमावल्या असो. या सर्वच गोष्टींचा गावाला खूप फायदा झाला. आणि त्यामुळे मागील दोन दशके हा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि पहिलेच म्हटल्याप्रमाणे निसर्गाने दोन्ही हातांनी उधळलेल्या अनुपम सौन्दर्यांचे जणू एक शिल्पच झाले आहे.
परंतु खंत या एका गोष्टीची देखील आहे कि आमच्याकडे इतके निसर्ग सौदर्य आहे हे आम्ही सांगायला कमी पडलो. फक्त हेच नाही तर गावाने केलेल्या अनेक गोष्ठी ज्या खरच प्रेरणादायी आहेत त्याही आमच्या माध्यामातून सांगायला कमी पडलो.
WOTR संस्थेमुळे पाणी आणि पाणलोट क्षेत्र विषयाचा अभ्यास करण्यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यातील एक हजारच्या वर टीम येऊन गेल्या. एव्हढेच नाही तर जगभरातील ४८ पेक्षा जास्त देशांच्या अभ्यासकांनी भेटी दिल्या. तथा जानकीदेवी बजाज संस्थेच्या २००+ पेक्षा जास्त गावांना, बायफ संस्थेच्या १५०+ गावांना तर पानी फाउंडेशन स्पर्धेत सहभागी ५०० पेक्षा जास्त गावांना म्हसवंडीने पानलोटाचे प्रशिक्षण दिले आहे.
हे सर्व असताना देखील सर्वसामान्य लोकांना देखील गावची, निसर्गाची माहिती व्हावी आणि ती पर्यटनाच्या दृष्टीने इतरांपर्यत पोहचावी हा आमचा इथून पुढच्या काळातला उद्देश आहे.
हळूहळू आणि या गोष्टी लोकांपर्यत पोहचवण्यात यशस्वी देखील होत आहोत. याचाच परिणाम म्हणून का होईना आताच भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेच्या एका शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण देखील येथे पार पडले आहे.
अनेक छायाचित्रकार देखील या परिसराला भेट देण्यासाठी येत आहेत आणि ते देखील या निसर्गाचे कौतुक करून याला काश्मीरची उपमा देत आहेत.
याच परिसराचे काही फोटो आपल्यासाठी….!
एकदा अवश्य भेट द्या.
सर्व फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
( फोटो सौजन्य :- उमेश थोरात , सागर बोडके )






































































































